- अपर्णा पाटील (श्रीवर्धन)
आज आपण कोकणी पद्धतीचे तळलेले पापलेट करण्याची कृती शिकणार आहोत.
त्यासाठी लागणारे साहित्य:
१. मध्यम आकाराचे ताजे पापलेट.
२. वाटणासाठी आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि ओले खोबरे.
३. हिंग, हळद, लाल मसाला(कोकणी), तांदळाचे पीठ आणि कोकमाचे आगळ किंवा लिंबू.
कृती:
सर्वात आधी पापलेट स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर पापलेट भरण्यासाठी पोटाकडून चिरून घ्यावेत. आतील अनावश्यक घटक काढून पुन्हा स्वच्छ धुवावेत.
धुतलेल्या पापलेटांना लिंबू किंवा आगळ, हिंग, हळद, मीठ आणि लाल मसाला लावून बाजूला ठेवणे.
भरण्यासाठी मसाला करण्याची कृती: आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि ओले खोबरे मिक्सर किंवा पाट्यावर वाटून घेणे.
शेगडी वर कढई ठेवून त्यात १ चमचा तेल गरम करून घ्यावे. मग त्यात वाटलेला मसाला, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद टाकावी. सगळा मसाला एकजीव करून परतून घ्यावा आणि गॅस बंद करावा.
हे वाटण थंड झाल्यावर मसाला लावलेल्या पापलेट मध्ये भरून घ्यावे. हे पापलेट तांदळाच्या कोरड्या पिठामध्ये हलकेसे बुडवून तव्यावर तेलामध्ये तळण्यास ठेवावेत. पापलेट दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यावेत.
कोकणी भरलेले पापलेट आता तुमच्या पोटात जाण्यास तयार आहेत. हे तांदळाच्या भाकरी सोबत किंवा भातासोबत वाढावेत.
Comments